वन विभागाची इगतपुरी तालुक्यात मोठी कारवाई
आरोपीच्या घरातून वन्यजीवांचे अवयव जप्त - एकाविरुद्ध गुन्हा दाखल
इगतपुरी :- वनपरिक्षेत्र कार्यालय इगतपुरी प्रादेशिक यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे मौजा गिरणारे (ता. इगतपुरी) येथे धाड टाकून आरोपीच्या घरातून वन्य प्राण्यांचे विविध अवयव जप्त करत एका संशयितास ताब्यात घेतले आहे. सदर प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस पुढील तपासासाठी मा. न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग, इगतपुरी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. दि. ०८ मे २०२६ रोजी दुपारी अंदाजे ३.०० वा. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक इगतपुरी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, मौजा गिरणारे येथील एका व्यक्तीच्या घरात वन्यजीवांचे अवयव बेकायदेशीररित्या साठवून ठेवण्यात आले आहेत. सदर माहितीच्या आधारे वन विभागाच्या पथकाने सायंकाळी अंदाजे ५.०० वा. संबंधित ठिकाणी जाऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आरोपीच्या घराची झडती घेतली. झडतीदरम्यान आरोपी नामे चंद्रकांत राजेंद्र माळी (वय अंदाजे ३३ वर्षे,रा. गिरणारे (बनवाडी),ता. इगतपुरी,जि.नाशिक) याच्या घरातून विविध वन्यजीवांचे अवयव जप्त करण्यात आले. यामध्ये सांबर शिंग,काळवीट शिंग,रानडुक्कर दात,घुबडाचे अवयव,साळींदर काटे तसेच मोरपिसांचा समावेश आहे. सदर प्रकरणी आरोपीविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत आरोपीने सदर अवयव वेगवेगळ्या ठिकाणांहून आणल्याची माहिती दिली असून धार्मिक व दैविक कार्यात त्यांचा वापर होत असल्याचे सांगितले आहे. दरम्यान,प्राप्त गुप्त माहितीनुसार आरोपीकडे बंदूक असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्या अनुषंगाने अधिक तपास सुरू असून संबंधित शस्त्राचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. कारवाईनंतर आरोपीस ताब्यात घेऊन वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात पुढील चौकशी करण्यात आली. त्यानंतर वैद्यकीय तपासणी करून आरोपीस तात्पुरत्या स्वरूपात पोलीस विभागाच्या ताब्यात ठेवण्यात आले आहे. आज आरोपीस पुढील तपासासाठी पोलीस कोठडी मिळण्याकरिता मा. न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सदर कारवाई सिद्धेश सावर्डेकर उपवनसंरक्षक, पश्चिम भाग नाशिक तसेच कल्पना वाघेरे सहाय्यक वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत कांचन भुसाळ,वनपरिक्षेत्र अधिकारी इगतपुरी,वनपाल गावित,भोये,पवार,दिवाणे वनरक्षक पाटील,साबळे,धादवड,बागुल,गांगुर्डे,पोटिंदे,गावंडे आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. वनपरिक्षेत्र अधिकारी कांचन भुसाळ यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, वन्यजीवांचे अवयव बाळगणे, व्यापार करणे अथवा त्यांचा अवैध वापर करणे हा वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत दंडनीय गुन्हा असून अशा प्रकारची माहिती तात्काळ वन विभागास द्यावी.