माजी आमदार रामभाऊ मोझे यांचे निधन
गोरगरिबांच्या आयुष्यात शिक्षणाची ज्ञानज्योत पेटवणारे निस्वार्थी जननेतृत्व हरपले;मुख्याध्यापक संजय सोमवंशी
शिरूर (प्रतिनिधी: विजय ढमढेरे):- पुण्यातील बोपोडी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रामभाऊ मोझे यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. जेष्ठ नेते शरद पवार यांचे समर्थक म्हणून ते ओळखले जात.१९७५ मध्ये ते काॅंग्रेसच्या तिकीटावर पुणे महानगर पालिकेचे नगरसेवक म्हणून पहिल्यांदा निवडून आले होते. सलग तीन वेळा नगरसेवक म्हणून त्यांनी काम पाहिले.स्थायी समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भुषविले होते.
सन १९८५ ते १९९५ या काळात बोपोडी विधानसभा मतदारसंघाचे सलग तीन वेळा त्यांनी प्रतिनिधित्व केले होते. गेनबा सोपानराव मोझे ट्रस्ट या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात योगदान दिले असून येरवडा, बालेवाडी,लोहगाव,चंदननगर तसेच वाघोली येथे या संस्थेच्या शाखा आहेत.
माजी आमदार रामभाऊ मोझे यांच्या निधनाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना चंदननगर येथील विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय सोमवंशी म्हणाले,गोरगरिबांच्या आयुष्यात शिक्षणाची ज्ञानज्योत पेटवणारे तळागाळातील लोकांसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणारे निस्वार्थी जननेतृत्व हरपले अशी प्रतिक्रिया मुख्याध्यापक संजय सोमवंशी यांनी मोझे यांच्या निधनाबद्दल व्यक्त केली.