• Total Visitor ( 430965 )
News photo

मालवणात माजी आमदार वैभव नाईक यांना जोरदार धक्का

Raju tapal July 14, 2025 75

मालवणात माजी आमदार वैभव नाईक यांना जोरदार धक्का

ठाकरे शिवसेनेच्या जिल्हा प्रवक्त्यांसह तीन माजी नगरसेवकांनी कार्यकर्त्यांसह केला भाजपात प्रवेश..



मालवण नगरपालिकेत आगामी निवडणुकीत भाजपचे कमळ फुलविण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण झाले आतापासूनच आक्रमक



मात्र या प्रवेशाने शिंदे शिवसेना पक्षाची डोकेदुखी वाढली आहे.



सिंधुदुर्ग :- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी होम ग्राउंडवर भाजप पक्ष बळकट करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.तर नगरपालिकेवर भाजपचेच कमळ फुलविण्यासाठी चव्हाण हे आक्रमक झाले आहेत.त्याचप्रमाणे उबाठा शिवसेनेच्या दांडी येथील माजी नगरसेविका सेजल परब व उबाठा उपशहर प्रमुख सन्मेष परब यांचा काल अनपेक्षितपणे भाजपात प्रवेश घेतल्यानंतर ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते व माजी नगरसेवक मंदार केणी यांच्यासह माजी बांधकाम सभापती यतीन खोत, माजी महिला व बालकल्याण सभापती दर्शना कासवकर, भाई कासवकर, अशोक कासवकर व युवा सेना उपशहरप्रमुख अमन गोडावले यांच्यासह उबाठाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी ठाकरे शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करीत भाजपचे कमळ हाती घेतले आहे.या प्रवेशामुळे आमदार वैभव नाईक यांना जरी धक्का बसला असला तरी मात्र शिंदे शिवसेना पक्षाची डोकेदुखी या प्रवेशामुळे वाढली आहे.



गेले काही दिवस माजी आमदार वैभव नाईक यांच्या विशेष मर्जीतले असणाऱ्या या दिग्गज पदाधिकाऱ्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती. त्याला अखेर सोमवारचा मुहूर्त मिळाला आहे. या दिग्गजांच्या प्रवेशामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला मोठे पाठबळ मिळणार आहे. केणी, खोत यांचा ग्रामीण भागातही मोठा जनसंपर्क असून त्यामुळे पं. स., जि. पं. निवडणुकीतही पक्षाला ताकद मिळण्याचा अंदाज भाजप श्रेष्ठीकडून व्यक्त होताना पाहायला मिळत आहे.



भाजपच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या या पक्ष प्रवेशावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. मंदार केणी हे धुरीवाडा प्रभागातून तब्बल तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. यांनी आपल्या राजकीय वाटचालीची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस मधून केली. त्यानंतर नारायण राणे काँग्रेसमध्ये असताना ते काँग्रेस मध्ये आले. त्यावेळी ते काँग्रेसचे तालुकाध्यक्ष होते. मात्र २०१८ मध्ये राणेंची साथ सोडून त्यांनी ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला. ग्रामीण भागात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. तर माजी बांधकाम सभापती यतीन खोत हे मागील दोन टर्म नगरसेवक असून कट्टर शिवप्रेमी व हिंदुत्ववादी अशी त्यांची ओळख आहे. ते देखील मंदार केणी यांच्या सोबत काँग्रेस मधून ठाकरे शिवसेनेत आले होते. त्यांचा ही ग्रामीण व शहरी भागात दांडगा जनसंपर्क आहे. माजी आ.वैभव नाईक यांच्या विशेष मर्जीतले म्हणून या दोन्ही नगरसेवकांची ओळख होती. मंदार केणी यांना वैभव नाईक यांनी ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते पद दिले होते. तर माजी नगरसेविका दर्शना कासवकर या देखील तीन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. या सर्वांचा भाजप प्रवेश ठाकरे गट आणी माजी आमदार वैभव नाईक यांना धक्का देणारा आहे. आज मुंबईतील पक्ष प्रवेश कार्यक्रमात मंदार केणी, यतीनखोत, दर्शना कासवकर, भाई कासवकर शाखाप्रमुख, नंदा सारंग - उपशहरप्रमुख, नितीन पवार शाखा प्रमुख, सई वाघ - शाखाप्रमुख, अमन घोडावले उप शहरप्रमुख युवासेना, संजय कासवकर - शाखाप्रमुख, अशोक कासवकर आदींनी भाजपात प्रवेश केला.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement