जातेगाव बुद्रुक टपाल कार्यालयातून रक्कम लंपास
शिरूर:- शिरूर तालुक्यातील जातेगाव बुद्रुक टपाल कार्यालयातून भरदिवसा रक्कम लंपास करण्याची घटना घडली.जातेगाव बुद्रुक येथील टपाल कार्यालयात पोस्ट मास्तर सुरेश मारूती निलख वय -६५ रा.मुखई ता.शिरूर हे मंगळवारी दि.१९ मे २०२६ रोजी नेहमीप्रमाणे कामकाज करत होते. एका अनोळखी युवकाने पोस्ट कार्यालयात येऊन पोस्टमास्तर सुरेश निलख यांच्याकडे सुट्ट्या पैशांची मागणी केली. निलख हे अन्य कामात असताना संबंधित व्यक्तीने संधी साधून ड्राॅवरमध्ये हात घालून १८ हजार रूपयांची रोकड काढली. रक्कम घेवून तो पळून जावू लागल्याने निलख व अन्य ग्रामस्थांनी त्याला आवाज दिला. मात्र त्याने बाहेर उभ्या असलेल्या दुचाकीवरून पळ काढला. शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.