साष्टे-कोलवडी,केसनंद-तळेरानवाडी-आव्हाळवाडी येथील शिवरस्ता खुला करण्याच्या हालचालींना वेग
पुणे :- पूर्व हवेली तालुक्यातील महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या साष्टे-कोलवडी-केसनंद-तळेरानवाडी-आव्हाळवाडी येथील शिवरस्ता खुला करण्याच्या प्रक्रियेला प्रशासनाच्या वतीने वेग आला असून,यासंदर्भात हवेली तालुक्याचे भूमी अभिलेख खात्याचे उपअधीक्षक कार्यालयाकडून नोटीस जारी करण्यात आली आहे.अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य कोमल संदेश आव्हाळे,कोलवडी-साष्टे ग्रामपंचायतीचे आदर्श सरपंच विनायक गायकवाड यांनी दिली.हवेलीचे भूमी अभिलेखचे उपअधीक्षक यांनी लोणी काळभोरचे अपर तहसीलदार यांना पाठविलेल्या पत्रानुसार,साष्टे-कोलवडी,केसनंद-तळेरानवाडी-आव्हाळवाडी हा शिवरस्ता खुला करण्याची कार्यवाही दिनांक ३ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून करण्यात येणार आहे.यावेळी संबंधित गावचे मंडळ अधिकारी,ग्रामसेवक अधिकारी,ग्रामपंचायत प्रतिनिधी तसेच शिवरस्ता लगतचे शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत. लोणी काळभोर तहसील कार्यालय यांच्या आदेशानुसार ही कार्यवाही राबविण्यात येत असून,शिवरस्ता खुला करण्यासाठी आवश्यक सूचना व समन्वय साधण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.सदर रस्ता खुला झाल्यास परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असून,शेतीमाल वाहतूक,शेतात ये-जा तसेच कृषी कामांसाठी मोठी सोय निर्माण होणार आहे.अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मार्गाच्या प्रश्नामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.मात्र आता प्रशासनाच्या पुढाकारामुळे हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच या शिवरस्ता खुला करण्याच्या कामामध्ये जिल्हा परिषद सदस्य कोमल संदेश आव्हाळे,सुरेखा रमेश हरगुडे,कोलवडी-साष्टे गावचे आदर्श सरपंच विनायक गायकवाड,केसनंदचे प्रशासक सरपंच सरपंच विशाल हरगुडे, यांचे मोलाचे योगदान असल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक पातळीवर सातत्याने पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केल्याचे नागरिकांनी सांगितले. आव्हाळवाडी - मांजरी खुर्द - तळेरानवाडी - कोलवडी - साष्टे - वाडेबोल्हाई हा शिवरस्ता लवकरात लवकर खुला करण्यात यावा याबाबतचे निवेदन अपर तहसीलदार तृप्ती कोलते यांना जिल्हा परिषद सदस्य कोमल संदेश आव्हाळे,सुरेखा रमेश हरगुडे,कोलवडी-साष्टे गावचे आदर्श सरपंच विनायक गायकवाड,केसनंदचे प्रशासक सरपंच सरपंच विशाल हरगुडे यांच्या वतीने देण्यात आले आहे. या निर्णयामुळे ग्रामस्थ व शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून,लवकरात लवकर रस्ता खुला व्हावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. यासोबतच वडगाव शेरी विधानसभा मतदार संघाचे आमदार बापूसाहेब पठारे,शिरूर-हवेली विधानसभा मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांचे देखील या कामासाठी विशेष योगदान लाभल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले.त्यांच्या मार्गदर्शन व पाठपुराव्यामुळे प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा शिवरस्ता महत्वाचं ठरणार - विशेष म्हणजे,हा शिव रस्ता भविष्यात वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने देखील महत्त्वाचा ठरू शकतो.तळेराणवाडी मार्गे थेट खराडी बायपासला जोडणी उपलब्ध झाल्यास वाघोली परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असल्याचे स्थानिक नागरिकांचे मत आहे.त्यामुळे या रस्त्याकडे केवळ शेतकऱ्यांच्या दृष्टीनेच नव्हे तर वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीनेही महत्त्वाच्या पर्यायी मार्गाच्या स्वरूपात पाहिले जात आहे.