ताजणेवस्ती पुलावरील रस्त्याची दुरवस्था
शिरूर:- तालुक्यातील ताजणेवस्ती येथील पुलावरील रस्त्याची दुरवस्था झालेली असून ब-याच दिवसांपासून पुलावरील रस्त्याची दुरूस्ती करण्यात आलेली नाही. ताजणेवस्ती येथील रस्ता कासारी फाटा येथे पुणे अहिल्यानगर महामार्गाला जोडलेला असून राऊतवाडीजवळ हा रस्ता शिक्रापूर मलठण रस्त्याला जोडलेला आहे. ताजणेवस्ती येथे ओढ्यावरील पुलाचे काम तीन -चार वर्षांपूर्वी करण्यात आले. या पुलावरील रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडलेले असून हा रस्ता ब-याच ठिकाणी खराब झालेला आहे. ताजणेवस्तीपासून जातेगाव बुद्रुक येथील व्यंकटेशकृपा शुगर मिल्स साखर कारखाना जवळच असून सध्या ऊस तोडणीचा हंगाम सुरू आहे. कोंढापुरी,कवठीमळा,निमगाव म्हाळुंगी,कासारी,खंडाळे शिवारातील व्यंकटेशकृपा साखर कारखान्याकडे केली जाणारी ऊस वाहतूक ताजणेवस्ती,वाबळेवाडी मार्गे केली जात आहे. ताजणेवस्ती पुलावर तसेच पुलापासून जवळच रस्त्यावर खड्डे पडून रस्त्यांची अतिशय दुरवस्था झालेली असून ऊस वाहतूक करणारी वाहने हेलकावत प्रवास करत असतात. ताजणेवस्ती पुलावरील रस्त्यावरून राऊतवाडी,वाबळेवाडी,बुरूंजवाडी,गणेगाव खालसा,वाघाळे,मलठण,मोराची चिंचोली,पिंपळे खालसा,हिवरे या गावांकडे जाणारी येणारी वाहनेही प्रवास करत असतात. प्रवाशांचे हित लक्षात घेवून ताजणेवस्ती येथील पुलावरील तसेच पुलाजवळील रस्त्याचे चांगल्या प्रतीचे डांबरीकरण करणे अतिशय गरजेचे आहे.