संगमेश्वरमध्ये सोनवी पुलाजवळ खड्ड्यांचा विळखा; अपघातास आमंत्रण
संगमेश्वर तालुक्यातील कसबा ते माभळे दरम्यानच्या महामार्गावर, विशेषतः सोनवी पुलाजवळ आणि पैसाफ़ड हायस्कूल समोरच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत. हे खड्डे वाहनचालकांसाठी मोठे संकट ठरत असून, यामुळे अपघात घडण्याची शक्यता वाढली आहे.
स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हे खड्डे आणखी भयंकर बनले आहेत. वाहनधारकांना रस्त्यावरून जाणे धोकादायक बनले असून, विशेषतः दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
ठेकेदार कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
खड्ड्यांमुळे जर एखादा अपघात झाला, तर संबंधित ठेकेदार कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. “सरकारने रस्त्यांचे काम करताना ठराविक निकष आणि दर्जा पाळणे बंधनकारक केले आहे. जर हे खड्डे वेळेत न भरले, आणि कोणताही अपघात घडला, तर संबंधित अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदार कंपनीवर गुन्हा दाखल केला जावा,” अशी भूमिका नागरिकांनी मांडली आहे.
प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी
या मार्गावरून दररोज शेकडो वाहनांची ये-जा असते. त्यामुळे प्रशासनाने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष घालून खड्डे भरावेत, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.