कारेगाव येथील पुणे -अहिल्यानगर रस्त्यावर खड्डे
शिरूर:- शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे पुणे -अहिल्यानगर,अहिल्यानगर -पुणे महामार्गावर खड्डे पडून महामार्गाची दुरवस्था झाल्यामुळे महामार्गावरून प्रवास करणारे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. कारेगाव येथे थांबाव्या लागणा-या वाहनांना वाहने साईडला घेताना महामार्गावर असलेल्या खड्ड्यातून वाहने चालवत साईडला घ्यावी लागतात. साईडला थांबलेल्या वाहनांना ओव्हरटेक करताना महामार्गावरून शिरूरच्या दिशेने प्रवास करणारी वाहने महामार्गावर असलेल्या खड्ड्यातून मार्गक्रमण करत असतात. तसेच कारेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ असलेल्या वळण रस्त्यावरही खड्डे पडलेले आहेत. वळण रस्त्यावर असलेल्या दुभाजकाजवळचा महामार्ग रस्ता बॅरिकेटेड लावून उजवीकडे वळणा-या वाहनांसाठी बंद केलेला आहे. याठिकाणी महामार्गावर मोठे खड्डे असल्यामुळे शिरूर वरून पुण्याच्या दिशेने प्रवास करणा-या वाहनांना खड्ड्यांंतून आपापली वाहने चालवत प्रवास करावा लागत आहे. तसेच पुणे -अहिल्यानगर महामार्गावरील सरदवाडी गावाच्या अलिकडे शिरूरच्या दिशेने प्रवास करणा-या वाहनांना वळण रस्त्याच्या कडेला असलेल्या साईडपट्टीवरील मोठ्या खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे. या ठिकाणापासून जवळच गतिरोधक असून गतिरोधकाजवळही खड्डे पडलेले आहेत. या ठिकाणचे तसेच कारेगाव येथील रस्त्यावरील खड्डे डांबर मिश्रीत खडीने बुजविणे अतिशय गरजेचे आहे.