राजापूरात घरफोडी १३ लांखाचा ऐवज लंपास
राजापूर :- राजापूर शहरात गेल्या दोन दिवसापासुन आषाढी एकादशी व मोहरम एकत्र आल्यामुळे मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. शहरात सर्वत्र पोलिस बंदोबस्त असतानाच शहरात दोन ठिकाणी धाडसी घरफोडी झाली आहे. लॅविश अपार्टमेंटमध्ये झालेल्या चोरीमध्ये सुमारे १३ लाख ऐवजावाची चोरी झाली आहे. राजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अमित यादव यानी अशी माहीती दिली. महिन्याभरात राजापूरातील ही दुसरी घटना घडली असल्याने या चोरीचा छडा लावण्यासाठी पोलीसांना कसरत करावी लागणार आहे.
आठवडा बाजारमध्ये बसून फळ विक्री करणारे संतोष भाबुद्रे याच्या मालकीचे जकात नाका नजीक असलेल्या लॅविश अपार्टमेंटमध्ये फ्लॅट आहे. संतोष संतोष माबुद्रे हे शनिवारी काही कामानिमित्त बाहेर गेले होते. दरम्यान त्यांची पत्नी, मुल व त्यांच्या मावशी विरंगुळा म्हणून रानतळे येथे पिकनिक पॉईटला गेले होते. दरम्यान संतोष भाबुद्रे हे प्रथम घरी आले. त्यावेळी त्यांना घराचा दरवाजा उघडा असून आतिल कपाटे विस्कटेल्या अवस्थेत आहेत. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले घरातील पैसे व मौल्यवान वस्तूची चोरी झाली आहे. त्वरीत त्यांनी पोलीस स्थानकांशी संपर्क साधत या घटनेची माहीती दिली. यावेळी धंदाच्या कामाकरीता ठेवलेले सुमारे ७ लाख रूपये रोख व सुमारे ६ लाख रूपयांच्या दागिनांची चोरी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. दिवसाढवळ्या चोरी झाली असल्याने कोणीतरी माहितगार असल्याचा अंदाज यावेळी व्यक्त करण्यात आला.
गेल्या दोन दिवसापासुन आषाढी एकादशी व मोहरम एकत्र आल्यामुळे राजापूर शहरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. शहरात सर्वत्र कडेकोट पोलिस बंदोबस्त असतानाच ही धाडसी घरफोडी झाली आहे त्यामुळे राजापूरच्या सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. या महिन्याभरात ही दुसरी घरफोडीची घटना घडलेली आहे. यापुर्वी कोंडये येथील चार घराची घरफोडी झाली होती. लॅविश अपार्टमेंट मध्ये ज्या फ्लॅट मध्ये चोरी झाली त्या फ्लोअरवर एकुण ११ फ्लॅट असुन त्यातील तीन फ्लॅट कायमस्वरुपी बंद असतात व बाकीचे फ्लॅट वापरात आहेत. या वापरात असणाऱ्या फ्लॅटचे मालक काही कामानिमित्त बाजारात गेलेले असताना चोरट्यानी ही घरफोडी केली असल्याने शहरात खळबळ उडाली आहे. शहरात भर दिवसा मोठी घरफोडी करीत चोरट्यानी सुमारे १३ लाखाच्या ऐवजावर मारला डल्ला असल्यानें राजापूर पोलिसांनी नागरिकाना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान शनिवरी पेट्रोलपंपा समोरील सिंधुरत्न अपार्टमेंटमधील ए विंगमध्ये यशवंत साईनाथ महाडीक यांच्या फ्लॅट दाराची कड़ी तोडून आतमध्ये जात चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या ठिकाणी काहीच नसल्याने त्यांना हात हलवित तेथून पोबारा करावा लागला. मात्र या दोन्ही घटनेने राजापुरात एकच खळबळ उडाली असून नागरीकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.