• Total Visitor ( 430079 )
News photo

कोकणातील लोकप्रिय युट्युबर शिरीष गवस यांचे दुःखद निधन

Raju tapal August 03, 2025 119

कोकणातील लोकप्रिय युट्युबर शिरीष गवस यांचे दुःखद निधन;

अवघ्या ३३ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप 



मुंबई :- कोकणची खाद्यसंस्कृती घराघरात पोहोचवणारे कोकणातील लोकप्रिय युट्यूबर, 'रेड सॉइल स्टोरीज' या युट्यूब चॅनेलचे निर्माते शिरीष गवस यांचं निधन झालं झालं आहे. वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. शिरीष यांच्या निधनानं सोशल मीडियावर शोक व्यक्त केला जात आहेत.



शिरीष गवस यांना ब्रेन हॅमरेज झाल्याची माहिती समोर येतेय. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर गोव्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. वर्षाभरापूर्वीच त्यांना मुलगी झाली होती. शिरीष यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शिरीष यांचे रेड सॉइल स्टोरीज नावाचे युट्यूब चॅनेल आहे. त्यांची पत्नी पूजा हिच्या सहाय्याने ते या चॅनलच्या माध्यमातून कोकणातील पारंपरिक जीवन, कोकणची खाद्यसंस्कृती जगभरात पोहोचवण्याचे काम करत होते. पारंपारिक कोकणी खाद्यपदार्थ, स्थानिक सण-उत्सव हे त्यांनी लोकापर्यंत पोहोचवले. मातीच्या भांड्यात व चुलीवर शिजवलेले जेवण यामुळं जुन्या काळातील वारसा त्यांनी पुन्हा जगासमोर आणला होता. 



पूजा आणि शिरीष दोघंही मुंबईत वास्तव्यास होते. कोरोना काळात दोघेही कोकणातील सिंधुदुर्गातील गावी स्थायिक झाले. शिरीष मुंबईत सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत होते. कोकणात आल्यावर त्यांनी स्वतःचं काहीतरी सुरू करायचे ठरवले होते. त्यानुसार त्यांनी स्वतःचं युट्यूब चॅनेल सुरू केले. रेड सॉइल स्टोरीज असं नाव दिलं. अल्पावधीतच त्यांचे हे चॅनेल लोकप्रिय झाले. त्यांच्या रेसिपीजही लोकांना आवडू लागल्या. इतकंच नव्हे तर मोठमोठ्या सेलिब्रिटीदेखील त्यांच्या या चॅनलवर येऊ लागले होते. शिरीष गवस यांच्या निधनाबाबत इन्फ्लुएन्सर अंकिता प्रभूवालावलकरने इन्स्टा्ग्रामवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. शिरीषच्या मृत्यूची बातमी ऐकून धक्का बसला, या बातमीवर विश्वासच बसत नाही, अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे. ३३ वर्षांच्या शिरीषच्या जाण्यानं त्याच्या कुटुंबाला तसंच मित्र परिवाराला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि आई, वडील, बहीण असा परिवार आहे.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement