• Total Visitor ( 449522 )
News photo

नवोपक्रम स्पर्धेत समीना शेख अनिस यांचा प्रथम क्रमांक

Raju tapal January 03, 2026 32

नवोपक्रम स्पर्धेत समीना शेख अनिस यांचा प्रथम क्रमांक





अमरावती; राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र यांच्या मार्फत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2025 - 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेची जिल्हास्तरीय फेरी नुकतीच पार पडली. भातकुली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक उर्दू शाळा धामोरी येथे कार्यरत शिक्षिका समीना शेख अनिस यांच्या नवोपक्रमास अमरावती जिल्ह्यामध्ये ‘प्राथमिक शिक्षक’ या गटात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र यांच्या मार्फत दरवर्षी पूर्व प्राथमिक,प्राथमिक,माध्यमिक,विषय साधन व्यक्ती व अधिकारी या पाच गटात राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात येते. या वर्षीही सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले असून या स्पर्धेची जिल्हास्तरीय फेरी संपन्न झाली आहे. सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांमधून पहिल्या फेरीचे मूल्यांकन करून उत्कृष्ट ठरणाऱ्या निवडक स्पर्धकांना दुसऱ्या फेरीमध्ये सादरीकरणाची संधी देण्यात येते व त्या आधारावर जिल्हास्तरीय विजेते निश्चित करण्यात येतात. अत्यंत प्रतिष्टेच्या मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेमध्ये समीना शेख अनिस यांच्या ‘आओ नई खिडकी खोले.. हर घर पडणे की फिजा’ उपक्रमास प्राथमिक शिक्षक गटातून अमरावती जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच आता हा उपक्रम राज्यस्तरीय फेरीसाठी पात्र ठरलेला आहे. सदर उपक्रम विद्यार्थी,पालक,माजी विद्यार्थी आणि नव साक्षर यांच्यामध्ये वाचनाची गोडी निर्माण करणे आणि वाचनामध्ये सातत्य राखणे या हेतूने सुरू करण्यात आला. शालेय पाठ्यपुस्तकांसोबतच अवांतर वाचनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे ज्ञान वृद्धिंगत व्हावे याकरिता हा उपक्रम फलदायी ठरला. सदर उपक्रम हा विद्यार्थ्यांसह पालक,माजी विद्यार्थी आणि नव साक्षर सर्वांसाठी उपयुक्त आहे हे विशेष. सध्याच्या डिजिटल युगात मोबाईलमुळे विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम खूप वाढलेला आहे; तो कमी करून विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके यावी यासाठी हा नवोपक्रम राबविण्यात आला असे समीना शेख अनिस यांनी पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. समीना शेख अनिस यांच्या यशाकरिता सर्व स्तरावरून अभिनंदनचा वर्षाव होत आहे. समीना शेख अनिस यांनी यापूर्वी शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीमध्ये तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकाविलेला आहे तसेच विनोबा ऍपमध्ये सुद्धा सातत्याने पोस्ट ऑफ द मंथ,स्टार टीचर हे अवॉर्ड सुद्धा यांनी मिळवलेले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अमरावती यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांकरिता आयोजित ‘स्पेल बी’ या स्पर्धेत समीना शेख अनिस यांच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. सावित्रीबाई फुले यांचा वसा पुढे चालवत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याकरिता सातत्याने धडपड करणाऱ्या समीना शेख अनिस यांच्या या यशात केंद्रप्रमुख धरमठोक सर, शाळेतील मुख्याध्यापक आरिफ सर आणि इतर शिक्षिकेने सुद्धा मदत केलेली आहे. समीना शेख अनिस या शिक्षिकेने नाविन्यपूर्ण आणि उपयुक्त असा नवोपक्रम सादर करून स्पर्धेत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवून पंचायत समिती भातकुलीचे नावलौकिक वाढवले असे मत गटविकास अधिकारी तुषार दांडगे तसेच गटशिक्षणाधिकारी रामेश्वर माळवे यांनी व्यक्त केले असून राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरीकरून जिल्ह्याचा मान वाढवावा यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर,शैलेन्द्र दहातोंडे,उमेश चुनकीकर,संतोष राऊत सह शिक्षक समिती कडून अभिनंदन करण्यात आले.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement