• Total Visitor ( 572639 )
News photo

अतिभार व अवैध मालवाहतुकीविरोधात राज्यव्यापी तपासणी मोहीम

Raju Tapal publisher June 06, 2026 24

अतिभार व अवैध मालवाहतुकीविरोधात राज्यव्यापी तपासणी मोहीम



मुंबई : राज्यातील रस्ते सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या अतिभार (ओव्हरलोड) व इतर अवैध मालवाहतुकीच्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयाने राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. परिवहन आयुक्तांनी सर्व प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना पत्राद्वारे निर्देश देत सांगितले आहे की, अतिभार वाहतुकीबाबत वारंवार तक्रारी प्राप्त होत असून अशा वाहनांमुळे अपघातांचा धोका वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर मानण्यात आली आहे.या मोहिमे अंतर्गत राज्यातील विविध आरटीओ कार्यालयांच्या पथकांना इतर जिल्ह्यांमध्ये पाठवून संयुक्त तपासणी करण्यात येणार आहे. ६ जून २०२६ ते ११ जून २०२६ या कालावधीत विशेष तपासणी पथके नियुक्त करण्यात आली असून दोषी आढळणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे.तपासणीसाठी बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या पथकांना संबंधित कार्यालयांनी ई-चलन मशीन, वाहन तपासणीसाठी आवश्यक साधने तसेच वाहन व चालक उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच कारवाईचा सविस्तर अहवाल २२ जून २०२६ पर्यंत परिवहन आयुक्त कार्यालयात सादर करावा लागणार आहे.या निर्णयामुळे राज्यातील अतिभार व अवैध मालवाहतुकीला आळा बसण्यास मदत होईल,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांचा या विशेष मोहिमेत समावेश करण्यात आला आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement