स्वच्छता ही सेवा २०२५ अभियान निमगाव म्हाळुंगी गावात साजरे
शिक्रापूर (प्रतिनिधी) :- शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथे स्वच्छता ही सेवा -२०२५ अभियान उत्साहपूर्ण वातावरणात साजरे करण्यात आले.
ग्रामपंचायत निमगाव म्हाळुंगी, विद्या विकास मंदिर महाविद्यालय आणि ITC मिशन सुनहरा कल - फिनिश सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
या उपक्रमात ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. स्वच्छता रॅली, श्रमदान, रांगोळी स्पर्धा, कविता स्पर्धा तसेच पथनाट्य अशा विविध उपक्रमांचे या कार्यक्रमात आयोजन करण्यात आले होते. विशेष आकर्षण ठरलेल्या "टाकाऊपासून टिकाऊ" या उपक्रमात विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून उपयुक्त आणि टिकाऊ वस्तू साकारून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. या अभियानात रांगोळी आणि कविता स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळाली तर पथनाट्याच्या माध्यमातून स्वच्छतेचे महत्त्व प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचविण्यात आले. या उपक्रमाला ग्रामपंचायत पदाधिकारी, विद्या विकास मंदिर विद्यालयाचे शिक्षक, ITC मिशन सुनहरा कल - फिनिश सोसायटीचे प्रतिनिधी, निमगाव म्हाळुंगी गावचे विद्यमान सरपंच डॉ.सचिन बबनराव चव्हाण, के.के.वागदरीकर, वर्षा शिंदे, ग्रामपंचायत अधिकारी गुलाबराव भाऊसाहेब नवले, म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मा कांतीलाल मामा टाकळकर, संचालक काकासाहेब कर्पे,विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चे प्राचार्य रमेश जाधव सर, शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामपंचायत व शैक्षणिक संस्थांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा अभियान उपक्रम यशस्वीरित्या पार पडला असून स्वच्छता व पर्यावरण संवर्धनासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन नियमितपणे करण्याचा संकल्प ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आला आहे असे सरपंच डाॅ.सचिन बबनराव चव्हाण यांनी "टिटवाळा न्यूज"ला सांगितले.