• Total Visitor ( 519452 )
News photo

खाद्यतेलाच्या नावाखाली बेकायदेशीर डिझेलची वाहतूक करणारा टँकर जप्त

Raju Tapal publisher May 24, 2026 16

खाद्यतेलाच्या नावाखाली बेकायदेशीर डिझेलची वाहतूक करणारा टँकर जप्त



४१.२६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत,दोन आरोपींवर गुन्हे दाखल



ठाणे :- मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव आणि कसारा परिसरामध्ये प्रशासनाकडून बेकायदेशीर इंधन वाहतुकीविरोधात जोरदार मोहीम उघडण्यात आली आहे.  एका धाडसी कारवाईत कसारा पोलीस ठाणे हद्दीत 'एडिबल ऑईल' म्हणजेच खाद्यतेलाच्या नावाखाली बेकायदेशीररीत्या डिझेलची वाहतूक करणारा एक मोठा टँकर जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ४१ लाख २६ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून टँकर चालक आणि मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपर पोलीस अधीक्षक (ठाणे ग्रामीण) यांच्या आदेशानुसार मुंबई-नाशिक महामार्गावरील चिंतामणवाडी पोलीस चौकीसमोर पोलिसांची नाकाबंदी सुरू होती. यादरम्यान नाशिकच्या दिशेने एका टँकरमधून अवैधरीत्या पेट्रोलियम इंधनाची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती शहापूर विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांमार्फत कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सुरेश गावीत यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने पहाटे ३:४० वाजण्याच्या सुमारास मुंबई बाजूकडून येणारा संशयास्पद टँकर (क्रमांक MH-46-BU-2388) बॅरिकेडिंग करून थांबवला. टँकर चालक आसिफ करीम सय्यद (रा. पिंप्री,जि. सोलापूर) याच्याकडे चौकशी केली असता, टँकरमध्ये डिझेल असल्याचे त्याने कबूल केले. हे डिझेल त्याने टँकर मालक श्यामसुंदर अंगद दहिफळे (रा. कळंबोली,पनवेल) याच्याकडून गडचिरोली येथील सुरजागड खाणीत विक्रीसाठी नेण्यासाठी ताब्यात घेतले होते. या वाहतुकीबाबत कोणत्याही परवानग्या किंवा वैध कागदपत्रे नसल्याने ही वाहतूक पूर्णपणे अवैध असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर शहापूर महसूल कार्यालयाच्या पुरवठा लिपिक नम्रता वाळू वरकुटे आणि पंचांच्या समक्ष टँकरची तपासणी करण्यात आली. टँकरच्या कप्प्यांमध्ये ९०.५६ रुपये प्रति लिटर दराचे एकूण २९,००० लिटर बेकायदेशीर डिझेल आढळून आले. पोलिसांनी २६ लाख २६ हजार २४० रुपये किमतीचे डिझेल आणि १५ लाख रुपये किमतीचा टँकर असा एकूण ४१ लाख २६ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कोणतेही वैध मापदंड किंवा करारनामा न करता,थेट पेट्रोल पंपावरून डिझेल भरून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने ही धोकादायक वाहतूक केली जात होती. या प्रकरणी पोलीस हवालदार सुनील दत्तात्रेय थाळेकर यांच्या फिर्यादीवरून चालक आणि टँकर मालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियमाच्या विविध कलमांन्वये कसारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सुरेश गावीत पुढील तपास करत आहेत. या मोठ्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव मस्के-पाटील यांनी ठाणे जिल्ह्यातील जनतेला जाहीर आवाहन केले आहे की,जिल्ह्यात डिझेल व तत्सम इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. कोणीही अतिरिक्त इंधन साठा करून ठेवू नये. अफवांवर विश्वास ठेवू नये. इंधनाची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाकडून अत्यंत कडक कायदेशीर कारवाई केली जाईल,असा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिला आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement