दुबईत मराठी भाषिकांचा आवाज अजून बुलंद - रवींद्र चव्हाण
मुंबई :- व्यवसाय आणि नोकरीनिमित्त दुबईत राहणाऱ्या दीड लाख मराठी भाषिकांकरिता नुकतीच महाराष्ट्र परिषदेची स्थापना केली गेली. संयुक्त अरब अमिरातीत राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी स्थापन केलेल्या इंडियन पीपल्स फोरम या व्यापक संस्थेची अंगीकृत संस्था म्हणून ही परिषद कार्यरत राहणार आहे. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत दुबईत महाराष्ट्र कौन्सिलची मुहूर्तमेढ रविवार, दि ४ मे रोजी रोवली गेली.
स्थापना सोहळ्याप्रसंगी बोलताना रविंद्र चव्हाण म्हणाले की महाराष्ट्र काउन्सिलच्या 'महा हेल्पलाइन' आणि 'युनायटेड महाराष्ट्र प्लॅटफॉर्म' या अत्यंत महत्त्वाच्या उपक्रमांमुळे दुबईस्थित मराठी माणसांचा आवाज अधिक बुलंद होईल आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिक बळ मिळेल. तसेच महाराष्ट्र सरकार आणि आयपीएफ यांच्यातील समन्वय वाढेल. तर काही कारणाने अडचणीत सापडलेल्या युएईस्थित मराठी लोकांना त्यांच्या मातृभाषेतून मदत उपलब्ध व्हावी या उद्देशाने "050 365 HELP" ही 'महा हेल्पलाइन' सेवा २४ तास उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याद्वारे शासकीय आणि कायदेशीर मदतीसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. त्याच बरोबर 'युनायटेड महाराष्ट्र' या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून युएईच्या सामाजिक क्षेत्रांत कार्यरत असलेल्या ४० संस्था एका छताखाली आल्या आहेत, यामुळे महाराष्ट्राचा एकतेचा संदेश युएईमध्ये सर्वदूर पोहोचेल असे प्रतिपादन रवींद्र चव्हाण यांनी केले.
युएईमध्ये राहणाऱ्या भारतीयांची सद्य:स्थिती, त्यांच्या समस्या आणि प्रश्न समजून घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी भाजपाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन रवींद्र चव्हाण यांनी दिले. दुबईत मराठमोळ्या पद्धतीने आणि मोठ्या दिमाखात संपन्न झालेल्या या सोहळ्यात युएईमधील व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने महाराष्ट्राचे नाव उंचावणाऱ्या 'ग्लोबल महाराष्ट्रिय' व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्यात आला.
"इंडियन पीपल्स फोरम (IPF), याची स्थापना २०१३ मध्ये युएईमध्ये झाली होती. IPF ही युएईमधील भारतीय प्रवासी समुदायाला पाठिंबा देणारी सर्वात मोठी सामाजिक-सांस्कृतिक संघटनांपैकी एक आहे. IPF युएई २३ विभागांमध्ये कार्य करते – ज्यामध्ये अमीरातीप्रमाणे अध्याय, १२ राज्य परिषदा, एक बिझनेस कौन्सिल आणि खास तरुणांसाठी IPF युवा व महिलांसाठी IPF महिला परिषद यांचा समावेश आहे. IPF युएईचे १०,००० हून अधिक सक्रिय समर्थक आहेत आणि IPF युएईने 'मरहबा मोदी २०१५' व 'अह्लान मोदी २०२४' सारख्या युएईतील काही सर्वात मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात मोलाचा वाटा उचलला आहे.
राहुल तुळपुळे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित परिषदेत कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, भारताचे यूएई येथील राजदूत सतीश कुमार शिवन, IPF UAE प्रमुख जितेंद्र वैद्य आणि शेकडो भारतीय विशेषतः मराठी भाषिक उपस्थित होते. रवींद्र चव्हाण यांची युएई दौऱ्यादरम्यान भारतीय दूतावासामध्ये भारताचे Consulate General आदरणीय सतीश कुमार सिवन यांच्यासमवेत सदिच्छा भेट आणि चर्चा झाली. भारत-युएई व्यापारातील महाराष्ट्राची भूमिका, आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात होऊ घातलेली महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती आणि दुबईतील व्यावसायिकांना महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या संधी अशा विविध विषयांवर चर्चा झाली. भाजपा कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की या व्यतिरिक्त दुबईतील 'दुबई बिजनेस कम्युनिटी' आणि 'दुबई महाराष्ट्र मंडळाच्या' सदस्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यात कृतार्थ राजा, सागर देसाई, सबिना खोत, दिलावर दलवाई, प्रिया जाधव, प्रसाद दातार, सचिन जोशी, अमोल वैद्य, के.जी.नारकर, राकेश पाटील, शिरीष पटवर्धन, विजेंद्र सुर्वे, राहुल तुळपुळे, रवी चिटणीस, सुहास रेगे, रोहित आगले, IPFचे राहुल तुळपुळे आणि भाजपा आमदार निरंजन डावखरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.