कोंढापुरी येथील पाझर तलावाचा धबधबा प्रवाहीत
शिक्रापूर :- गेल्या दहा दिवसांपासून पडलेल्या मुसळधार,अतिमुसळधार पावसामुळे शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील पाझर तलावाचा धबधबा प्रवाहीत झाला आहे.शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील गावचे कुलदैवत खंडोबा मंदीराच्या कडेला ३.७५ दशलक्ष घनमीटर पाणी साठवण क्षमतेचा पाझर तलाव असून या पाझर तलावात १५ दिवसांपूर्वी १४ मे २०२५ दरम्यान चासकमान धरणातील पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले होते.गेल्या १० दिवसांपासून पडलेल्या मुसळधार,अतिमुसळधार पावसामुळे हा पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरून पाझर तलावातील पाणी सांडीद्वारे वाहू लागल्याने पाझर तलावाचा धबधबा प्रवाहीत झाला आहे.धबधबा प्रवाहीत झाल्याने कोंढापुरी येथील तलाव परिसराला निसर्गरम्य दृश्य प्राप्त झाले आहे.धबधब्याद्वारे प्रवाहीत झालेले पाणी कामिनी ओढ्यावरील पुलावरून वाहू लागले आहे.कामिनी ओढ्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने खंडाळे शेतीशिवाराकडे जाणा-या दुचाकीस्वारांना स्मशानभूमी रस्त्याचा पर्यायी मार्ग अवलंबवावा लागला.पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने कोंढापुरी,खंडाळे, गणेगाव खालसा शिवारातील शेतक-यांनी समाधान व्यक्त केले आहे.
या पाझर तलावातील पाण्याचा उपयोग शेतक-यांसह शिक्रापूर,श्री.क्षेत्र रांजणगाव गणपती गावातील ग्रामस्थांना पिण्यासाठी होत आहे.दरम्यान, आज बुधवार दि.२८ मे २०२५ रोजी सकाळपासून दुपारपर्यंत पावसाने उघडीप दिली. येत्या ४ दिवसांत २८ मे ते ३१ मे २०२५ पर्यंत पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.रत्नागिरी,सिंधुदुर्ग,रायगड,सातारा,घाटमाथा,चंद्रपूर,गोंदिया,भंडारा,नागपूर या जिल्ह्यांसाठी आॅरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून मुंबई,ठाणे,पुणे,कोल्हापूर,छत्रपती संभाजीनगर,जालना, परभणी,हिंगोली,नांदेड,बीड,लातूर,नाशिक,नंदुरबार,जळगाव,धुळे,अमरावती,बुलढाणा,गडचिरोली,अकोला, यवतमाळ,वर्धा,वाशिम या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.सध्याची पावसाची स्थिती लक्षात घेऊन नागरिकांनी सतर्क राहावे,वादळी वारे वातावरणात झाडाखाली थांबणे टाळावे,सुरक्षित स्थळी निवारा घ्यावा असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे कोंढापूरी ( शिरूर जि.पुणे )