खरपुडी येथील खंडोबा मंदीरात चोरी ; ४० लाखांचा ऐवज लंपास
शिरूर :- प्रतिजेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेड तालुक्यातील खरपूडी येथील खंडोबा मंदीरात चोरी होण्याची घटना शुक्रवार दि.५ डिसेंबरला मध्यरात्री घडली.सुमारे ४० लाख रूपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लुटून नेला. अज्ञात चोरट्यांनी मुख्य मंदीराचे कुलूप तोडून गाभा-यात प्रवेश करून कुलदैवत खंडोबा,म्हाळसा,व बानू देवीच्या मुर्ती वरील चांदीचे दागिने,उत्सव मुर्ती स्वयंभु पिंडीचा चांदीचा कवच,देवाची चांदीची पगडी,चांदीचे ६ मोठे हार,बानू म्हाळसाचा मुकूट,सिंहासनावरील वाघाची मुर्ती असा एकूण २१ किलो चांदीचा ऐवज,दानपेटीतील ६० ते ७० हजार रूपये असा एकूण सुमारे ४० लाखांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लुटून नेल्याचे समजले.गुरूवारी दि.४ डिसेंबरला रात्री मंदीर परिसरात कोणीही नसल्याचा फायदा चोरट्यांनी घेतला.पहाटे ५ वाजता पुजारी देवपूजा करण्यासाठी आल्यानंतर कुलूप तुटलेले,गाभारा उघडा दिसल्याने चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. मंदीर परिसरातील सी सी टी व्ही कॅमेरे पूर्णपणे बंद होते असेही समजले. पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण चोरीच्या या घटनेचा पुढील तपास करत आहेत.