• Total Visitor ( 429431 )
News photo

महिला, मुलींची छेडछाड करणाऱ्यांना दणका बसणार

Raju tapal June 06, 2025 67

महिला, मुलींची छेडछाड करणाऱ्यांना दणका बसणार;

सुरक्षेसाठी पीएमपीच्या प्रमुख स्थानकांवर पोलीस पथक



पुणे :- बस प्रवासासह स्थानकांवर चोरी, महिला व मुलींची छेडछाड करणाऱ्यांवर पुणेपोलिसांची आता करडी नजर राहणार आहे. त्यासाठी पुणे पोलिसांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पोलिस पथकाचा फौजफाटा नेमण्यात आला आहे. यापुढे बस प्रवासात छेडछाड, अश्लील हावभाव करणारे आणि घाणेरडे मजकूर लिहणाऱ्या भामट्यांसह चोरट्यांना दणका बसणार आहे.



पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत पुणे,पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए कार्यक्षेत्रातील प्रवाशांकरिता सार्वजनिक बससेवा पुरविली जाते. पीएमपीकडून ३८१ मार्गावर दररोज २० हजार फेऱ्यांद्वारे प्रवासी सेवा दिली जाते. त्यामधून १० लाखांपेक्षा जास्त नागरिक प्रवास करतात.



दररोजच्या बस संचलनादरम्यान प्रवाशांच्या सुरक्षिततेसंदर्भात काही गंभीर समस्यांच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने अज्ञात व्यक्तींकडून प्रवासादरम्यान प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी, छेडछाड, काही असामाजिक घटकांकडून बीआरटी बसस्थानकांमध्ये अश्लील मजकुरांचे लिखाण करणे, अशा घटना घडत आहेत. या अनुचित घटनांमुळे विशेषतः महिला प्रवासी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण होत असून, त्या संदर्भात प्रवाशांकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.



अशा घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी मुख्य बसस्थानकांवर तसेच गर्दीच्या प्रमुख मार्गांवर सकाळी व रात्रीच्या वेळेत पोलिस यंत्रणेमार्फत नियमित गस्त घालणे अत्यावश्यक असल्याबाबत पीएमपी अध्यक्षांनी पोलिस आयुक्तांना गस्त घालण्याबाबत पोलिस आयुक्तांना निवेदन दिले होते. त्यानुसार पुणे पोलिसांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांसह २६ जणांची नेमणूक करण्यात आली आहे.



असा असेल पोलिसांचा फौजफाटा



पोलीस निरीक्षक :- दोन

सहाय्यक पोलीस निरीक्षक :-एक

पोलीस उपनिरीक्षक :-एक

पोलीस कर्मचारी :-२२

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement