जिनांनी पाकिस्तान निर्माण केला;पण स्वतःचे वंशज भारतातच राहिले!
जिनांची एकुलती एक मुलगी दिना आणि नातू नुसली वाडिया यांचा भारताशी राहिला कायमचा संबंध
मुंबई :- भारताच्या फाळणीचा इतिहास सांगताना मोहम्मद अली जिना यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. मात्र,पाकिस्तानच्या निर्मितीचे प्रमुख शिल्पकार असलेल्या जिना यांच्या स्वतःच्या कुटुंबाने पाकिस्तानऐवजी भारतात राहण्याचा निर्णय घेतला. त्यांची एकुलती एक मुलगी दिना वाडिया आणि नातू नुसली वाडिया यांनी भारताशी असलेले नाते कायम ठेवले. या कुटुंबाची कहाणी जिना यांच्या राजकीय भूमिकेपेक्षा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक विरोधाभास अधोरेखित करणारी आहे. या कहाणीची एक बाजू मुंबईतील प्रसिद्ध वाडिया घराण्याच्या इतिहासाशी जोडलेली आहे. १७३६ मध्ये सुरतहून मुंबईत आलेल्या लवजी नुसरवानजी वाडिया यांनी इंग्रजांसाठी जहाजबांधणीचा व्यवसाय सुरू केला. १७५० मध्ये त्यांनी आशियातील पहिली ड्राय डॉक उभारल्याचे सांगितले जाते. पुढे वाडिया घराण्याने उद्योग, समाजसेवा आणि आरोग्य क्षेत्रातही मोठे योगदान दिले. दरम्यान,जिना यांच्या वैयक्तिक आयुष्यात १९१६ मध्ये महत्त्वाचे वळण आले. प्रसिद्ध उद्योगपती दिनशा पेटीट यांची कन्या रतनबाई (रुत्ती) पेटीट आणि जिना यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. कुटुंबीयांचा विरोध असतानाही रुत्ती यांनी धर्मांतर करून १९१८ मध्ये जिनांशी विवाह केला. १५ ऑगस्ट १९१९ रोजी त्यांना दिना नावाची मुलगी झाली. मात्र, पुढे जिना आणि रुत्ती यांच्यात दुरावा निर्माण झाला आणि १९२९ मध्ये रुत्ती यांचे निधन झाले. जिना यांनी मुलगी दिनाला मुस्लिम संस्कारांमध्ये वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र,पुढे दिना यांचे प्रेम पारशी उद्योगपती नेव्हिल वाडिया यांच्यावर जडले. या विवाहाला जिनांचा तीव्र विरोध होता. मात्र,वडिलांच्या विरोधाची पर्वा न करता दिना यांनी नेव्हिल वाडिया यांच्याशी विवाह केला. या विवाहामुळे जिना आणि त्यांच्या मुलीच्या संबंधांमध्ये दुरावा निर्माण झाल्याचे इतिहासात नमूद केले जाते. १४ ऑगस्ट १९४७ रोजी पाकिस्तानची निर्मिती झाली आणि जिना पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल झाले.