• Total Visitor ( 509489 )
News photo

एका महिन्यात 41 जणांच्या हत्या करणारा क्रूरकर्मा !

Raju Tapal publisher May 07, 2026 43

एका महिन्यात 41 जणांच्या हत्या करणारा क्रूरकर्मा !



60 वर्षांपूर्वीची गोष्ट. मुंबईच्या उपनगरांत घराबाहेर,झोपड्यांत,फूटपाथवर झोपणाऱ्या लोकांची झोप उडाली होती. लोक रात्र रात्र जागून काढत होते. रात्री झोपलं की सकाळी आपण जिवंत असू,याची खात्रीच वाटत नव्हती. झोपेत असलेल्या लोकांवर हल्ला करून त्यांना ठार मारणारा क्रूर माथेफिरू रात्री शहरभर फिरत होता. दहशतवादीच होता तो. त्यामुळे निम्म्या लोकांनी चार-पाच तास झोपायचं,उरलेल्या निम्म्या लोकांनी जागं राहून येणाऱ्या-जाणाऱ्यांवर लक्ष ठेवायचं,हा प्रकार सु्रू होता. पाच तासानंतर झोपलेले उठून पहारा द्यायचे आणि मग जागे लोक झोपायला जायचे. असं बराच काळ सु्रू होतं. मुंबईला हादरवून टाकणारा एक क्रूरकर्मा. ज्याचं नाव होतं रामन राघव. तामिळनाडूच्या तिरुनलवेली जिल्ह्यातल्या एका गावी 1929 साली जन्मलेला रामन राघव 1995 साली तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगताना मूत्रपिंडं निकामी होऊन पुण्याच्या रुग्णालयात मरण पावला. तिथल्याच येरवडा तुरुंगात तो होता. रामन राघव हा सायको रामन,वेलुस्वामी,अण्णा,तंबी,सिंधी तलैवी,रिपर अशा नावानं ओळखला जाई. तलैवीचा अर्थ नेता. तामिळ समजत नसल्यामुळे तेव्हा मुंबई पोलिसांनी त्याचं नाव सिंधी दलवाई (तलैवीचं दलवाई?) केलं. पुढे विविध भाषेत त्याच्यावर चित्रपट निघाले. लोकांना रामन राघव हे नाव माहीत झालं. पण त्याची कृत्य व पोलिसांनी केलेला तपासही माहीत हवा. लाखो मुंबईकर भीतीच्या छायेखाली वावरत होते. कारण म्हणजे 1965-66 या 2 वर्षांत पूर्व उपनगरांत रात्री उघड्यावर झोपलेल्या 19 जणांवर जीवघेणे हल्ले झाले होते. त्यातील जखमीपैकी नऊ जण मरण पावले होते. हे हल्ले,खून कोण करतंय,का करत आहे,हे काही कळत नव्हतं. पोलिसांनी एका इसमाला संशयावरून ताब्यात घेतलं. वेडसर होता तो. पण त्याने हल्ले केल्याचे कोणतेही पुरावे हाती लागेनात. त्यामुळे त्याला सोडून मुंबईबाहेर पाठवलं. तो इसम बहुदा गेला पुण्याला. मग मुंबई शांत झाली. हल्ले पूर्णपणे थांबल्यानं हळूहळू सर्व मुंबईकरांना शांत झोप मिळू लागली. हा हल्ल्यांचा विषयही लोकांच्या डोक्यातून निघून गेला. एरवीही मुंबई लवकर रुळावर येते, त्यामुळे वातावरण शांत झालं. पोलिसांनीही सुटकेचा निःश्वास सोडला. दोन वर्षं अतिशय शांततेत गेले. संशयित इसमाला मुंबईबाहेर पाठवल्यामुळेच सारं शांत झालं होतं,याकडे सर्वांचंच दुर्लक्ष झालं. त्याचाही थांगपत्ता नव्हता. ज्या भागात हल्ले झाले होते, तिथं मात्र भीती कायम होती. अचानक 1968 साली मुंबईच्या उपनगरांत फूटपाथवर, झोपड्याबाहेर झोपणाऱ्या लोकांवर पुन्हा हल्ले सु्रू झाले. रोज रात्री हल्ले करून हल्लेखोर बेपत्ता होत होता. तो कसलेही पुरावे मागे सोडत नव्हता. झोपेत असलेल्या लोकांवर अंधारात हल्ले झाल्याने त्यांना हल्लेखोराचा चेहराही दिसू शकला नव्हता. त्याला कसं शोधावं हे पोलिसांपुढे मोठं आव्हान होतं. हल्ल्याची पद्धत मात्र सर्वत्र सारखी होती. झोपेतील लोकांच्या डोक्यावर,छातीवर आणि पोटाच्या खाली रॉडने तो हल्ला करायचा. रॉडचा फटका बसताच झोपेतील माणूस शक्यतो जागीच मरायचा. हल्लेखोर  पुरावा सोडत नसल्याने पोलीस गोंधळले होते. यापैकी बहुसंख्य हल्ले जून-जुलै 1968 मध्ये झाले होते. एका मृत महिलेवर बलात्काराचा प्रयत्नही झाला होता. मालाडमध्ये मुस्लिम शिक्षकाची आणि यादव कुटुंबातील दोघांची एकाच वेळी हत्या झाली,तर एका शिंप्याला ठार करण्यात आलं होतं. हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेने केलेल्या वर्णनानुसार हल्लेखोराचं चित्र तयार करून सर्व पोलिसांना पाठवण्यात आलं. पोलीस उपायुक्त रमाकांत कुलकर्णी तपासावर लक्ष ठेवून होते. ज्याच्याविषयी संशय येई,अशा प्रत्येकाला पोलीस ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेऊ लागले. दुसऱ्या पाळीतील नोकरी आटोपून मध्यरात्रीच्या सुमारास घरी परतणाऱ्या काही कामगारांनाही त्यांनी ताब्यात घेतलं. काहींना रात्रभर रस्त्यावर उभं केलं आणि त्यांची तिथंच झाडाझडती केली. जे कामगार रात्रभर घरी परतले नाहीत,त्यांच्या घरात खूपच काळजी व भीती असायची. घरच्या व्यक्तीचं बरं वाईट झालं की काय,हल्ला झाला की काय,असे विचार डोक्यात येत. वसाहतीतील पुरुष हातात लाठ्या-काठ्या घेऊन रात्रभर पहारा देत. अफवांनाही ऊत आला होता. पोलिसांनी मालाडमधून एकाला पकडलं,कुर्ल्यातून अटक केली. बोरिवलीला एका माणसाच्या डोक्यावर दगड घालण्याच्या तयारीत तो असताना पोलिसांनी त्याला उचललं,अशा असंख्य अफवा सु्रू झाल्या. मी तेव्हा गोरेगावच्या महापालिकेच्या शाळेत चौथीमध्ये होतो. आमच्या शाळेत चर्चा सु्रू झाली की तो धावत असताना पकडण्यासाठी पोलिसांनी त्याच्या अंगावर कुत्रा सोडला,तर तो आधी मांजर झाला आणि मग उंदीर बनून तो बिळात शिरला. अटक टाळायला एकदा तो झाडावर बसला. त्याला पकडण्यासाठी पोलीस झाडावर चढले आणि त्यांना पाहताच तो पोपट बनून उडून गेला. अशा गमतीदार अफवा. बऱ्याचदा हल्लेखोर म्हणे गोरेगावच्या जंगलात लपायला जायचा,असं पोलिसांना वाटत होतं. यावेळी जुलैमध्ये त्याने उपनगरातील एक दोन नव्हे,तर तब्बल 41 जणांना हल्ला करून ठार केलं होतं. मुंबईकरांवरील दहशत खूप वाढत चालली होती आणि गुन्हेगार सापडत नसल्यानं पोलिसांवर टीका होत होती. डोंगरी पोलीस ठाण्याचे सबइन्स्पेक्टर अॅलेक्स फियाल्हो 18 ऑगस्ट 1968 रोजी कामावर जाण्यासाठी बस स्टॉपवर उभे होते. त्यांच्या खिशात त्या संशयीताचं चित्र होतं. त्यांना त्याच स्टॉपवर एक जण दिसला. एका हातात छत्री असलेला. अजिबात पाऊस नसताना हातात छत्री का? फियाल्हो यांनी चौकशी केली तर तो म्हणाला की मी मालाडहून आलो आहे. आदल्याच दिवशी मालाडमध्ये हत्या झाली होती. झोपलेल्याची छत्री गायब झाली होती. अॅलेक्स फियाल्हो यांनी त्याला पोलीस चौकीत आणलं. तपासात त्याच्याकडे एक काडी नसलेला चष्मा व सुईत दोरा घालताना बोटाला ती लागू नये यासाठी शिंप्याकडे असतो तो अंगठा सापडला. शिंप्याचीही हत्या  झाली होती. मग त्याचा कसून तपास सु्रू झाला. तो आधी प्रश्नांची उत्तरं देत नव्हता. त्याला भरपूर नॉन व्हेज खायला दिल्यानंतर त्याने तोंड उघडलं. मग तो एक एक हत्येविषयी सांगू लागला. त्याने लपवलेला रॉडही पोलिसांना सापडला. तो सिझोफ्रेनिया या मानसिक आजाराचा पूर्वी रुग्ण होता. पण अटक केली,तेव्हा मात्र तो मानसिक रुग्ण नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. आपण काय करत आहोत,हे त्याला कळत होतं. तो लहानपणापासून गुन्हा करत होता. त्याच्या विरोधातील भक्कम पुराव्यामुळे रामन राघवला फाशीची शिक्षा झाली. त्याने सर्व गुन्हे मान्य केले होते. पुढे 1987 साली तिचं जन्मठेपेत रूपांतर करण्यात आलं. तो 1968 ते 1987 व नंतर 1995 पर्यंत कारागृहातच होता. त्याची 27 वर्षांनी मृत्यूने त्याची सुटका केली. 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement